Ad will apear here
Next
दिल पुकारे आ, रे, आ, रे....!
एस. डी. बर्मन आणि मजरूह सुलतानपुरी	एक ऑक्टोबर हा संगीतकार एस. डी. बर्मन आणि गीतकार मजरूह सुलतानपुरी यांचा जन्मदिन. त्या निमित्ताने ‘सुनहरे गीत’मध्ये आज पाहू या या जोडीच्या ‘दिल पुकारे आ, रे, आ, रे....!’ या गीताबद्दल... 
.........
एक ऑक्टोबर.... याच तारखेला १९०६मध्ये संगीतकार एस. डी. बर्मन यांचा जन्म झाला होता आणि याच तारखेला १९१९मध्ये गीतकार मजरूह सुलतानपुरी यांचा जन्म झाला होता. एस. डी. बर्मन यांचा जन्म त्रिपुरामध्ये झाला होता, तर उत्तर प्रदेशातील सुलतानपूर येथे मजरूह यांचा जन्म झाला होता. घरात गायन वादनाची परंपरा असल्यामुळे आणि बालपणापासूनच नावाडी, शेतकरी, मासे पकडणारे कोळी यांनी गायलेली गाणी, लोकसंगीत कानावर आल्यामुळे एस. डी. बर्मन यांचा कल संगीताकडे होता. जन्मजात असलेली संगीताची आवड या वातावरणामुळे वाढतच गेली.

मजरूह सुलतानपुरी यांच्या वडिलांचा कल धार्मिक कार्यक्रमाकडे असल्याने आपल्या मुलानेही धार्मिक कार्य करावे, म्हणून त्यांनी मजरूह यांना उर्दू, पर्शियन, अरेबिक भाषा शिकण्यास पाठवले. या भाषा शिकून काही धार्मिक कार्य करण्याऐवजी या भाषांच्या शिक्षणाच्या कालावधीत ते शेरोशायरीकडे आकर्षित झाले आणि त्यामध्येच त्यांनी प्रगती केली. त्या प्रगतीने त्यांना मुंबईच्या चित्रपटजगताची वाट दाखवली.

एस. डी. बर्मन यांना मात्र मुंबईच्या चित्रपट जगतात येण्याकरिता १९४४ साल उजाडावे लागले. म्हणजे वयाच्या ३८व्या वर्षी ते संगीतकार म्हणून ‘फिल्मिस्तान’ चित्रपट संस्थेत रुजू झाले. अर्थात तत्पूर्वी त्यांनी कलकत्त्यात संगीत क्षेत्रात चांगले नाव कमावले होते. लोकसंगीतावर त्यांचे एवढे प्रभुत्व होते, की प्रोग्रेसिव्ह रायटर्स असोसिएशनने १९३९ व १९४० या दोन वर्षांसाठी त्यांची बंगाली लोकसंगीत विभागाच्या प्रमुखपदी नियुक्ती केली होती. एस. डी. बर्मन यांचे मूळ नाव सचिन देव बर्मन असे होते, तर मजरूह यांचे मूळ नाव असरार हसन खान असे होते. काव्यलेखनाची त्यांची सुरुवात गज़ललेखनाने झाली. मजाज लखनवी या शायराकडून प्रेरणा घेऊन ते गज़ल लिहीत असत! आपले काव्य ते काव्यसंमेलनात सादर करू लागले. अनेकांनी त्यांना दाद देऊन प्रोत्साहित केले, तर नामवंत ज्येष्ठ शायरांनी त्यांचे कौतुकही केले. त्यामुळे प्रोत्साहित होऊन ते सुंदर काव्य करू लागले. सुप्रसिद्ध शायर जिगर मुराराबादी यांनी त्यांना प्रेरीत केले आणि त्यांचे ‘असरार’ हे नाव बदलून ‘मजरूह’ हे नाव त्यांना दिले आणि ‘खान’ऐवजी सुलतानपूरचे म्हणुन सुलतानपुरी असा बदल झाला. वयाच्या २६व्या वर्षी ते मुंबईत आले आणि निर्माता-दिग्दर्शक ए. आर. कारदार यांनी त्यांना ‘शाहजहाँ’ या त्यांच्या चित्रपटासाठी गाणी लिहिण्याची संधी दिली. १९४६मध्ये तो चित्रपट प्रदर्शित झाला व त्यामधील १० गीतांपैकी मजरूह यांनी लिहिलेल्या सात गीतांच्या लोकप्रियतेमुळे मजरूह यांचे नाव भारतभर प्रसिद्ध झाले.

वयाच्या ३८व्या वर्षी १९४४मध्ये चित्रपट जगतात आलेले ‘एसडी’ आणि वयाच्या २६व्या वर्षी १९४५मध्ये मुंबईच्या चित्रपटसृष्टीत प्रवेश करणारे मजरूह. दोघांच्या वयात १३ वर्षांचे अंतर; पण दोघांचा जन्म एक ऑक्टोबरचाच आणि आपल्या पुढील वाटचालीत हे दोघे एकत्र आले आणि चित्रपटप्रेमींसाठी अनेक मधुर गीते देऊन गेले. नौ दो ग्यारह, पेइंग गेस्ट, चलती का नाम गाडी, काला पानी, सोलहवाँ साल, सुजाता, डॉ. विद्या, सगीना, अभिमान, मंज़िल, बात एक रात की, बंबई का बाबू, लाजवंती अशा अनेक चित्रपटांत हे दोन कलावंत एकत्र आले आणि त्यांनी अनेक मधुर, अर्थपूर्ण आणि आशयसंपन्न अशी गीते दिली.

प्रेमिकांचे मनोगत व्यक्त करणारी गीते अनेक गीतकारांनी लिहिली आहेत; पण काही वेळा त्यामध्ये एकसुरीपणा आलेला दिसून येतो. परंतु मजरूह सुलतानपुरी यांनी लिहिलेल्या एका वेगळ्या आणि आनंदी प्रेमगीताबद्दल येथे सांगावेसे वाटते. यामधील उपमा, शब्द तर उत्कृष्ट आहेतच; पण त्याचे संगीतही तेवढेच मनाला आनंद देणारे आहे. त्याची चाल मंत्रमुग्ध करणारी आहे. अर्थातच ती चाल, ते संगीत एस. डी. बर्मन यांचे आहे. चिरतरुण संगीत देणारे हे संगीतकार, पडद्यावर हे गीत सादर करणारा चिरतरुण अभिनेता देव आनंद आणि त्याच्याबरोबर ‘सुंदर’ दिसणारी वैजयंतीमाला! दोघांचा प्रेमाचा वार्तालाप व्यक्त करताना मजरूह लिहितात....

अभी ना जा मेरे साथी

(आपल्या प्रेयसीला हृदयातून साद घालून प्रियकर सांगतो आहे.) प्रिये (माझे) हृदय तुला बोलवत आहे, ये, तू ये! आणि (आल्यानंतर) आता परत (मला सोडून) जाऊ नकोस. आणि अशीच साद प्रियकराची प्रिया लतादीदींच्या आवाजात देते. ईशान्य भारतातील संगीताचा आगळा आनंद घेत आपण या गीताचा पुढील भाग ऐकतो...

मोहम्मद रफी 
बरसों बीते दिल पे काबू पाते
हम तो हारे तुम ही कुछ समझाते

लता मंगेशकर
समझाती मैं तुमको लाखों अरमाँ
खो जाते हैं लब तक आते आते

मोहम्मद रफी 
पूछो ना कितनी बाते पडी है दिल में हमारे!

(तो म्हणतो, तुझ्या प्राप्तीच्या अभिलाषेपायी या माझ्या) हृदयावर नियंत्रण ठेवता ठेवता काही वर्षे गेली. (या खेळात) आम्ही हरलो (आणि) आम्हाला वाटले तुम्ही येऊन काही तरी समजूत काढाल. (पण तुम्ही आलाच नाहीत.) ‘त्याची’ ही तक्रार ऐकल्यावर ‘ती’ म्हणते - मजरूहजी ‘समझाते’ शब्दाचा धागा पकडूनच लिहितात, ‘(अरे माझ्या प्रिया) मी लाख तुझी समजूत काढेन (तुला समजावून सांगावे असे मला खूप खूप वाटते; पण ही लज्जा, प्रेमामुळे निर्माण झालेला संकोच, यामुळेच तुझ्याशी जे बोलायचे ते) पण ते ओठांपर्यंत येऊन थांबते. (लज्जेमुळे मी बोलू शकत नाही.)  ‘ती’ची ही अवस्था कळताच ‘तो’ म्हणतो, ‘आमच्या मनातसुद्धा अशा कित्येक गोष्टी आहेत (की ज्या मी बोलू शकलेलो नाही.) हा प्रेमसंवाद पुढील कडव्यातही चालू राहतो.

ती’
पा के तुमको है कैसी मतवाली
आंखे मेरी बिन काजलसे काली
‘तो’
जीवन अपना मैं भी रंगीन कर लूँ
मिल जाए जो इन होठों की लाली
‘ती’
जो भी अपना लायी हूँ सबकुछ पास तुम्हारे

काजळ न वापरताही माझे हे नेत्र कसे आकर्षक दिसत आहेत. कारण या नेत्रांना तुझे दर्शन झाले आहे. असे ‘ती’ म्हणताच ‘तो’ म्हणतो, ‘तुझ्या ओठांचा लाल रंग मला मिळाला, तर माझे जीवन रंगीत होईल.’ यावर ‘ती’ त्याला म्हणते, ‘माझे म्हणून जे जे काही आहे ते मी तुझ्याजवळ घेऊन आले आहे.

पुढील कडव्यात या गीताची अखेर करताना ते म्हणतात...
‘तो’
महका महका आँचल हलके हलके
रह जाती हो क्यों पल्कों पे मलके 
‘ती’
जैसे सूरज बनकर आए हो तुम
चल दोगे फिर दिन के ढलते ढलते
‘तो’
आज कहो तो मोड दूँ बढ़ के वक्त के धारे 

‘तुझ्या सहवासाने सुगंधित वाटणारा हा तुझ्या वस्त्रांचा पदर (अर्थात ही वस्त्रे) माझ्या पापण्यांच्या आत राहणारी तुझी छबी....प्रियकर असा आपल्या कौतुकात गुंगला असतानाच प्रिया त्याला जाणीव करून देते, की मला अशा मिठास गोष्टी सांगून गुंतवू नकोस. कारण तू सौख्य देणारा रविकिरण बनून माझ्यापुढे आला आहेस; पण दिवस मावळताच त्या दिनकराप्रमाणे निघून जाशील. आपल्या प्रियेची ही भीती लक्षात येताच तो म्हणतो, की तुला ही वेळ आपल्या मीलनाचे क्षण संपू नयेत असे वाटत असेल, तर मी या काळाला वेगळे वळण देऊ का? (हा काळ येथेच थांबवू का?)

दोन प्रेमिकांचा हा संवाद संगीतात बांधून श्रवणीय करण्याचे कसब सचिनदांचे व तो अर्थपूर्ण उपमांनी नटवण्याचे श्रेय मजरूह सुलतानपुरी यांचे.... सादरीकरण करणारा दिग्दर्शक विजय आनंद... सारेच सुनहरे... आज एसडी, मजरूह, विजय आनंद, देव आनंद कोणीही हयात नाहीत; पण यांसारख्या अनेक गीतांनी आपल्यातच आहेत.

- पद्माकर पाठकजी
मोबाइल : ८८८८८ ०१४४३

(लेखक चित्रपट समीक्षक आणि जुन्या चित्रपटगीतांचे अभ्यासक आहेत.)

(मजरूह सुलतानपुरी यांच्याबद्दल अधिक वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/EZZQBH
Similar Posts
आ नीले गगन तले... गीतकार हसरत जयपुरी यांचा आज (१७ सप्टेंबर) स्मृतिदिन. त्या निमित्ताने ‘सुनहरे गीत’मध्ये आज पाहू या त्यांनी लिहिलेले ‘आ नीले गगन तले’ हे गीत...
तेरे बिना जिंदगी से कोई ‘अष्टपैलू’ हे विशेषणही कमी पडेल, इतके पैलू असलेला अभिनेता संजीव कुमार याचा सहा नोव्हेंबर हा स्मृतिदिन. त्यानिमित्त ‘सुनहरे गीत’मध्ये आज पाहू या त्याच्यावर चित्रित झालेले ‘तेरे बिना जिंदगी से कोई...’ हे गीत...
रहें ना रहें हम... १६ नोव्हेंबर हा संगीतकार रोशन यांचा स्मृतिदिन. त्या निमित्ताने ‘सुनहरे गीत’ सदरात या वेळी आस्वाद घेऊ त्यांनी संगीतबद्ध केलेल्या ‘रहें ना रहें हम...’ या गीताचा...
तुम ही मेरे मंदिर... गीतकार राजेंद्रकृष्ण यांचा २३ सप्टेंबर हा स्मृतिदिन. त्या निमित्ताने ‘सुनहरे गीत’मध्ये आज पाहू या त्यांनी लिहिलेले ‘तुम ही मेरे मंदिर, तुम ही मेरी पूजा’ हे गीत...

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language